विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

Foto
मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. दरम्यान, आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतीलविधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका  ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली असून, या घटनेनंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण विधान भवन परिसराचा ताबा घेतला आहे.

विधिमंडळाचे महत्त्वाचे अधिवेशन सुरू असतानाच हा धमकीचा ईमेल प्राप्त झाला, ज्यामुळे यंत्रणांची धावपळ उडाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सध्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना विधान भवनामध्ये जाण्यापासून रोखण्यात आले आहे.  मुंबईपोलिसांचे पथक, बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले असून, इमारतीची कसून तपासणी केली जात आहे. 

सध्या विधीमंडळाचे कामकाज सुरू असल्याने विधान भवन परिसरात मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांची मोठी गर्दी असते. अशा वेळी मिळालेल्या या धमकीमुळे विधान भवनाची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. पोलिसांनी हा ईमेल कोठून आला, याचा तांत्रिक तपास सुरू केला आहे. ही धमकी केवळ अफवा आहे की घातपाताचा प्रयत्न, याचा शोध पोलीस घेत आहेत.

या मेलनंतर पोलिसांनी तात्काळ संपूर्ण विधानसभा परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केले. यावेळी सुरुवातील विधानसभा कर्मचाऱ्यांना बाहेर रोखण्यात आले. त्यानंतर थोड्यावेळाने आयडी आणि तपासणी केल्यानंतर पोलिसांकडून विधानभवनातील कर्मचाऱ्यांना विधानसभेत सोडण्यात आले. दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

आज सकाळी सीपीएच्या मेलवर धमकी आली. अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे बॉम्ब आणि मिसाईलची धमकी होती.  बॉम्ब डिस्पोजल स्कॉडने सर्व सखोल तपास सुरू केली आहे. आणखीन चार ठिकाणी धमकी दिली आहे, पोलिसांनी आवश्‍यक ती दखल घेतली आहे, अशी माहिती विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिली.

मुंबईतील 4 ठिकाणं मिसाईलने उडवून देण्याची धमकी
सुरक्षा अधिकारी काळजी घेत आहेत, धमकीच्या पार्श्‍वभूमीवर तपास सुरू आहे. अधिकची माहिती एवढ्या लवकर उघड करण योग्य होणार नाही. चौकशी अंती सर्व माहिती दिली जाईल, असं राम शिंदेंनी सांगितले. तसेच शेअर बाजार, उच्च न्यायालय, मेट्रो आणि बँक उडवून देण्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे. आज सकाळी 6.57 मिनिटांनी धमकीचा मेल आला होता, असं राम शिंदे म्हणाले. 

विधिमंडळ, मेट्रो, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला धमकी देणारा मेल खलिस्तानी आंदोलकांशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे. धमकी देणाऱ्याने मिसाईल आणि बॉम्बने संबंधित ठिकाणं उडवून देण्याचं मेलमध्ये नमूद केलं. सकाळी 6 वाजून 57 मिनिटांनी मेल आल्यानंतर तत्काळ सुरक्षेच्या गृह विभागाकडून सूचना देण्यात आल्या.